एका जागेसाठी युती सोडणार नाही : रामदास आठवले

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – मागील पाच वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे स्मारक हे प्रश्न मोदींनी सोडवले आहेत. त्यामुळे एखाद्या जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा आरपीआयला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि कार्य़कर्त्यांना महामंडळावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एखाद्या जागेसाठी युती तोडणे योग्य नसल्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बोलताना आठवलेंनी युती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. विधानसभेची बोलणी झाली आहे. विधानसभेला काही जागा मिळतील तसेच विधानपरिषदेचीही जागा मिळेल त्यामुळे पक्षाने नरेंद्र मोदी यांना धोका देणे योग्य नसून योग्य विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचे आठवले म्हणाले.

भाजपकडून सध्या चौकीदार ही मोहिम जोरात सुरु आहे. यावरही आठवलेंनी उत्तर दिलं. घराचे, सरकारचे, राहुल गांधी यांचे संरक्षण करण्यासाठी चौकीदार आवश्यक असल्याचं म्हणत भाजपाला 285 जागा मिळतील आणि एनडीएला 325 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.