प्रकाश आंबेडकरांचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाले अन्यथा विधानसभा निवडणुकीवर ‘बहिष्कार’ टाकणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभेत लागलेल्या आश्चर्यजनक निकालांमुळे लोकांमध्ये निवडणुकांबाबत साशंकता आहे. आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर त्यावर बहिष्कार टाकणार, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ईव्हीएममुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे आंबेडकर यांनी म्हंटले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय उपस्थित करताना मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या आंबेडकरांनी, आता चक्क विधानसभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. विद्यमान सरकार आणि निवडणूक आयोग हे पुन्हा ईव्हीएमवरच निवडणुका घेणार असतील तर आपण निवडणूक प्रक्रियेतच भाग घेऊ नये असा सल्ला राजकीय पक्षांना आंबेडकरांनी दिला आहे.

विधानसभेला बॅलेट येणार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होऊ, ही भूमिका महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. बॅलेट आलंच पाहिजे यावर मी ठाम आहे आणि नाही आलं तर विधानसभा लढणार नाही. यावर शंभर टक्के अंमल करण्याचा प्रयत्न करेन. तसेच बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षासोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

विधानसभेला काँग्रेस बरोबर नाही ?

लोकसभेत वंचित बहुजन आघाडीने जवळपास ४१ लाख घेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नऊ उमेदवारांचा पराभव केला. मात्र आगामी विधानसभेला वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता नसल्याचेही ते बोलले.