ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामसेवक संवर्गाचे विविध प्रश्न प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. सुमारे २५ मिनिटांच्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी अतिशय आस्थेवाईकपणे ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न जाणून घेतले. ग्रामसेवक युनियनने मांडलेल्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेवून प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी युनियनचे कोषाध्यक्ष संजीव निकम, जळगाव जि.प.कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस प्रशांत तायडे, वर्धा जिल्हा युनियनचे हेमंत भोमले, प्रवीण खोंडे, विवेक धवड, हितेश इमाने आदी उपस्थित होते.

ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सचिव स्तरावर केलेल्या पाठपुराव्यानंतर ग्रामसेवक युनियनने आपले गार्‍हाणे व प्रश्न थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्या आहेत. सातव्या वेतन आयोगातील त्रुटींमुळे ग्रामसेवक संवर्गावर शिक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या तुलनेत कसा अन्याय होत आहे, हि बाब प्रकर्षाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

सरपंच परिषदेप्रमाणे ग्रामसेवक परिषदेचे आयोजन करण्याबरोबरच प्रलंबित प्रश्नी वित्त विभाग व ग्रामविकास विभागाची संयुक्त बैठक युनियनच्या प्रतिनिधींसमवेत बोलविण्याची ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद समाधानकारक असून शासन दरबारी प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील, असा विश्वास युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like