काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर पी. चिंदबरम यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार आहे. पुढील तीन-चार महिन्यांमध्ये ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचीही निवड केली जाणार असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी गांधी कुटुंबीयांशिवाय अन्य कोणी नाही का? असा सवाल चिदंबरम यांना यावेळी करण्यात आला. आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर यातून बाहेर निघण्याचा एक मार्ग शोधला. महामारीच्या या काळात आम्ही काही महिन्यांचा वेळ मिळवला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सक्रीय नाहीत ही बाब चुकीची आहे. राहुल गांधी पक्षात सक्रीय आहेत. सध्या कोरोना महामारी सुरू असल्यामुळे सोनिया गांधी लोकांमध्ये सक्रीय दिसत नाही. त्यांच्या प्रकृतीसाठी ते योग्य नाही. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला अशाच प्रकारे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपावर अशी टीका झाली नव्हती. तर काँग्रेसवर आता अशा प्रकारे का टीका करण्यात येत आहे. माध्यमांना आता भाजपाला प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु ते काँग्रेसला प्रश्न विचारत आहे. माध्यमांनी कोणाच्याही एकाच्या बाजूने असू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.