राष्ट्रवादीला आम्ही नॅनो पार्टी बनविणार : मुख्यमंत्री

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. या निवडणुकीत माढ्यातून शरद पवार निवडणुकीच्या तयारीत होते. मात्र त्यांना वाऱ्याचा अंदाज आल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेत बाराव्या खेळाडूची भूमिका पार पाडणे पसंत केले. आता या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला नॅनो पार्टी बनवणार आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

राष्ट्रवादीला आता भाड्याने प्रवक्ते आणावे लागत असून बस, सायकल भाड्याने घेतात. पण पवारांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. तेही बंद पडलेले घेतले असून ते ना विधानसभेत चालेल, ना पालिका निवडणुकीत. कितीही वेळा म्हणालात ‘लाव रे तो व्हिडीओ, लाव रे व्हिडीओ’ पण जर २०१४ सालचा तो व्हिडीओ लावला तर काय अवस्था होईल ? हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा शब्दात राज ठाकरेंवर निशाणा साधला. राहुल गांधींचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही. आता काय खाऊन ते गरिबी हटवणार ? अशी टीका काँग्रेसवर केली.

सुप्रिया सुळे आणि भाजपाचे पदाधिकारी राहुल शेवाळे यांना घरात घुसून ठोकून काढण्याची धमकी देणारा ऑडिओ राज्यभर चर्चेचा विषय ठरला. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेत म्हणाले, सुप्रिया सुळे यांनीही मोदी यांचा गुण घेतला आहे. त्यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार असे सांगितले. त्याप्रमाणे त्या घरात घुसून मारण्याची भाषा करत असल्याचे सांगत सुळे यांच्यावर निशाणा साधला.