दूध उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसागणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. या कठीण परिस्थितीत भाजप-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


असाच प्रश्न आमच्या सरकारच्या काळात आला तेव्हा दूध संघांना प्रतिलिटर दूध खरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते. दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच. या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ही लढाई संपेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात आज (मंगळवार) झालेल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेते उपस्थित होते.