…म्हणून आम्ही काय तडफडून मरणार नाही : प्रविण दरेकर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis) यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली. देवेंद्र फडणवीस दरेकर यांच्याकडे असणारी बुलेट प्रूफ गाडी सुद्धा काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. आमची सुरक्षा काढली म्हणून आम्ही तडफडून मारणार नाही, जनतेला व महिलांना सरकारने सुरक्षा द्यावी, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(praveen darekar) यांनी व्यक्त केले. ते सोलापुरात वार्ताहरांना बोलत होते.

दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून धोका असल्याचा अहवाल पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचा असून, त्यांनी सुरक्षा आणखी वाढवण्याचे नमूद केले होते. मात्र, नव्या आलेल्या पोलीस महासंचालकांच्या काळात सुरक्षा कमी झाली आहे. या कामासाठीच नव्या पोलीस महासंचालकांना आणले का? असा सवाल उपस्थित करत, महाविकास आघाडी सरकारने सुरक्षेच्या बाबत घेतलेला निर्णय हा राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली.

औरंगाबाद नामांतरण विषयवार बोलताना दरेकर यांनी म्हटलं, हिंदूहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतरबाबत घेतलेल्या भूमिकेची कृती व्हावी. हा विषय नुसता बोलून चालणार नाही, तर नामांतराचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे उपमहापौर काळे यांच्याबाबत निर्णय घेतील. यामुळे या प्रकरणी मी जास्त बोलणे उचित होणार नाही, असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.