…तर मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरू करू : आदित्य ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मुंबईमध्ये नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून प्रस्ताव आल्यास पुण्यातदेखील ‘नाइट लाइफ’बाबत विचार करू’, असे आश्वासन पर्यटन तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे एक खासगी कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले कि, मुंबई हे असे शहर आहे, जिथे रात्रभर वर्दळ सुरू असते. तसेच नोकर वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवास करून कामावरून रात्री उशिरा घरी येणाऱ्या नागरिकांना खरेदी करता यावी, भूक लागली असल्यास त्याला जेवण सहज उपलब्ध व्हावे. यासाठी रात्रीदेखील शॉपिंग मॉल, दुकाने, हॉटेल सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरु करणाऱ्याचा प्रस्तावावर सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतले.

यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून शासनाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. पुण्यातदेखील कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, त्यामुळे जर तसा प्रस्ताव आल्यास पुण्यातदेखील ‘नाइट लाइफ’बाबत विचार करू’, असेही आदीत्य यांनी यावेळी म्हंटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/