‘मोदी कमजोर असून चीनला घाबरतात’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – आज फ्रान्सने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. परंतु हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. कारण फ्रान्सने हा प्रस्ताव मांडल्यानंतर चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. जेव्हा चीन भारताच्या विरोधात वागते तेव्हा नरेंद्र मोदींच्या तोंडून एक शब्दही निघत नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर , राहुल गांधी यांनी मोदींना कमजोर म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे . दरम्यान आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “मोदी हे करजोर असून चायनाला घाबरत आहेत. जेव्हा-जेव्हा चीन भारताच्या विरोधात भूमिका घेते तेव्हा नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत.” दरम्यान याच ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “ही मोदींची चीन डिप्लोमसी आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी  शी जिनपिंग यांच्यासोबत झोके घेतात , दिल्लीत गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात ” असा खोचक टोला राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा हल्ला झाला . याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली. यानंतर भारताने पाकिस्तान आणि मसूद अजहरविरोधात राजनितीक पातळीवरही आघाडी उघडली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांनी २७ फेब्रुवारी रोजी ‘अल कायदा निर्बंध समिती’च्या अंतर्गत अझरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. परंतु, या प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला आहे.

दरम्यान, चीनच्या या भूमिकेवर नरेंद्र मोदी काहीच व्यक्त झालेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मोदींवर टीकेचे ताषेरे आेढले आहेत. ट्विट करत त्यांच्यावर आपली तोफ डागली आहे.