खासदारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ ! शाॅटगन नं. १ तर सुप्रिया सुळे नं. ३ वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या तब्बल १५३ खासदारांच्या संपत्तीत भरभक्कम वाढ झाली आहे. या खासदारांच्या संपत्तीत तब्बल १४२ टक्क्याने वाढ झाल्याचे एका संस्थेच्या पाहणीनुसार आढळून आले आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या क्रमांकावर आहेत तर पिनाकी मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या पाहणीनुसार आकडेवारी समोर आली आहे. 
सुप्रिया सुळे तिसऱ्या स्थानावर 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पाच वर्षांमध्ये ( सन २००९ ते २०१४) १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाखांची वाढ झाली आहे. यात शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सर्वात जलद गतीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २००९ साली शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये इतकी होती. तर सन २०१४ मध्ये त्या संपत्तीत वाढ होऊन ती १३१ कोटी रुपयांवर गेली. बिजू जनता दलाचे (बीजेडी) पिनाकी मिश्रा यांची संपत्ती १०७ कोटी होती त्यात वाढ होऊन ती १३७ कोटींवर पोहचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे यांचा क्रमांक तिसरा लागतो. ५१ कोटींच्या त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन सन २०१४ मध्ये ती ११३ कोटींवर पोहोचली आहे.
पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची सन २००९ मध्ये सरासरी संपत्ती होती ५. ५० कोटी इतकी. यात दुपटीने वाढ होऊन ती सरासरी १३.३२ कोटी इतकी झाली. संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी १०व्या स्थानी आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सन २००९ मध्ये असलेल्या २ कोटीच्या संपत्तीत वाढ होऊन सन २०१४ मध्ये ती ७ कोटी इतकी झाली आहे.