Pune News : ‘माझ्या बहिणीचा नाद सोडून दे’, म्हणत तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणावर कोयता आणि लोखंडी रॉडने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) मध्यरात्री धानोरी येथे घडली असून मुलीचे वडील, भाऊ आणि त्यांचे इतर दोन साथिदारांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू गौतम भिसे (वय-25 रा. भैरवनगर, धानोरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी जखमी राजू भिसे याची आई सुनिता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांना प्रतिक ओव्हाळ, सुनिल ओव्हाळ, आशिष मोरे, जीवन परीयार या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू याचे प्रतिकच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. माझ्या बहिणीचा नाद सोडून दे, या कारणावरून चिडलेल्या प्रतिक, त्याचे वडील सुनिल आणि इतर दोन साथिदारांनी राजूला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

रोजूला रॉडने बेदम मारहाण करत असताना कोयत्याने त्याच्या डोक्यात सपासप वार केले. राजूला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईला देखील आरोपींनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ धाव घेत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा झेंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत.