Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ 13 राज्यात पावसाचा इशारा, वादळाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्हाबरोबर झगडणाऱ्या दिल्ली-एनसीआरमधील लोकांना त्यावेळी थोडा दिलासा मिळाला, जेव्हा शुक्रवारी सायंकाळी झालेल्या हलक्या पावसाने व वादळाने वातावरण सुखद बनवले. शुक्रवारी सकाळपासूनच दिल्ली व आसपासच्या भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत हवा थंड झाली आणि गाझियाबाद, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद, गुरुग्राम आणि आसपासच्या अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू झाली. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, देशातील बहुतेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस म्हणजेच शनिवार व रविवारी गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, डोंगरांवर बर्फवृष्टी देखील होऊ शकते.

या राज्यांमध्ये देण्यात आला पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. हवामानातील हा बदल शेतकऱ्यांना अडचणीत आणू शकतो, कारण या दिवसांत गहू कापणी चालू आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीसह काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज आहे. नेमकी हीच परिस्थिती रविवारी राहील.

गारपीट कोसळण्याचीही शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे की बंगालच्या उपसागरापासून जोरदार ओलसर वाऱ्याच्या कारणामुळे ईशान्य भारतातील तसेच पूर्वेकडील पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि पूर्व बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात शनिवार व रविवारी पाऊस सक्रिय होऊ शकतो. पावसासह या भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. खराब हवामानाच्या दरम्यान प्रशासनाने लोकांना जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने पावसाच्या परिस्थितीमुळे 18 एप्रिल रोजी सिक्कीम, बंगाल आणि बिहारला ऑरेंज अलर्टवर ठेवले आहे.

यावर्षी देशात सामान्य पाऊस
भारतीय हवामान खात्याने देशातील मान्सूनची परिस्थिती सांगितली असून यंदा देशात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. याखेरीज हवामान खात्याने पावसाळ्याच्या पॅटर्न आणि त्यात होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियांमुळे मान्सूनचे आगमन आणि जाण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रदेशात ‘मान्सूनच्या आगमनाच्या व परतीच्या’ तारखांमध्ये बदल केले आहेत. तथापि, हवामान खात्याने हे स्पष्ट केले आहे की भारतात मान्सूनच्या आगमनाच्या वेळी म्हणजेच केरळमध्ये कोणताही बदल होणार नाही.

मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या तारखांमध्ये बदल
हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की राष्ट्रीय हवामान अंदाज नेटवर्कमध्ये 3,500 रेन गेज स्टेशन आहेत ज्यातून 1961 ते 2019 दरम्यानच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून मान्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, जालंधरसारख्या शहरात मान्सून सुरू होण्याची तारीख 13 जुलै होती, परंतु आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे मान्सूनच्या आगमनाची तारीख 28 जून करण्यात आली आहे. यावर्षी देशाच्या एका मोठ्या भागात मान्सून वेळेपूर्वीच हजेरी लावणार असल्याचेही यातून सूचित होते.

एका आठवड्यापूर्वी मान्सून संपूर्ण देश व्यापेल
हवामान खात्याने सांगितले की, ‘आमच्या विश्लेषणानुसार मध्य आणि पूर्व भारतातील काही भागात मान्सूनचे आगमन 3 ते 7 दिवस उशिरा होईल, परंतु त्याच वेळी मान्सून राजस्थानात लवकर सक्रिय होईल. विशेष म्हणजे यावर्षी मान्सून एका आठवड्यापूर्वीच संपूर्ण देशात सक्रिय होणार आहे. 14 जुलैपर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यतः देशातील संपूर्ण भागाला व्यापतो. परंतु, या वेळेस सात दिवस अगोदर संपूर्ण देश व्यापला जाईल.