Weather Alert ! येत्या काही तासात पुण्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाड्यासह विदर्भालाही सतर्कतेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यासहित कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता शनिवारी (दि. 10) राज्यातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भात गारपीटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. या परिसरात पुढील 3 तासात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण नोंदवलं गेले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे काल कोकणातील काही भागासह पाचगणी आणि सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या.

त्यानंतर हवामानाने आपला मोर्चा पुणे, मुंबई, ठाणे आणि उपनगराकडे वळवला असून या भागातही ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर पुणे आणि साताऱ्याशिवाय उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर आणि विदर्भासाठी पुढील तीन तास खुप महत्त्वाचे आहेत. पुढील 3 तासात या परिसरात वादळी वा-यासह विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.