Cyclone Amphan : 3 लाख नागरिकांना हलविले सुरक्षितस्थळी

कोलकत्ता : वृत्तसंस्था – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ अम्फन आज सायंकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने गेल्या २ दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांना किनारपट्टीपासून सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्यांच्यासाठी कॅम्प उभारण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या टीम पश्चिम बंगाल आणि ओडिशात दाखल झाल्या आहेत. ओडिशाने १ लाख १९ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. ओडिशातील पारादीप येथून हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी साडेसात वाजता १२५ किमी दूर होते. येथे ताशी १०० किमी वेगाने वारे वाहताना दिसत आहे. किनारपट्टीवर ५ मीटरपर्यंत उंच लाटा उसळताना दिसत आहे.

पश्चिम बंगालच्या दिघापासून हे चक्रीवादळ २२५ किमी दूर आहे. हे चक्रीवादळ आज सायंकाळी उशिरा पश्चिम बंगालच्या दिघा आणि बांगला देशातील हटिया या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वार्‍याचा ताशी वेग १५५ ते १६५ किमी असण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे सध्या सर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या सखल आणि मातीच्या घरात राहणार्‍या लोकांना हलविण्याचे काम सुरु आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने नागरिकांना हलविणे सुरु ठेवले असून मदतीसाठी अनेक हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहे.

एनडीआरएफची पथके दोन्ही राज्यात किनारपट्टीवर दाखल झाली आहेत. तसेच सीमा सुरक्षा दलाची पथके सुंदरबन आणि इच्छामती नदी किनारी ३ तरंगत्या बाटी, ४५ गस्ती बोटीसह दाखल झाले आहे. सैनिकांबरोबरच इलेक्ट्रिशन, अभियांत्रिकी कर्मचारी या पथकही यांच्याबरोबर आहे. या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. मातीची घरे, किनारपट्टीवरील छोट्या मोठ्या बोटी यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळ संपल्यानंतर लोकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.