खुशखबर ! राज्यात गुरूवारी तर पुण्यात शुक्रवारपर्यंत दाखल होणार मान्सून, वेधशाळेचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रात उद्या (गुरुवार) मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सूचं आगमन होणार आहे. मागीली दोन दिवस तळकोकणात आणि गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिण किनारपट्टी भागात गुरुवारी (दि.11) मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सून वेगाने मार्गक्रमण करून शुक्रवारपर्यंत (दि.12) मान्सूनचा पाऊस पुण्यात दाखल होईल आणि आठवड्याच्या शेवटी मुंबईत दाखल होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

पुढील एक ते दोन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यांना आणखी दोन लागतील. सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे गोवा, तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी साधारण 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, असंही कश्यपी यांनी म्हटलं आहे.
पुढील 48 तासांचा अंदाज

येत्या 48 तासांत नैऋत्य मौसमी मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल, असा अंदाज पुणे वेध शाळेनं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्या टप्प्यात जोरदार पाऊस पडेल, असं ही वेध शाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. कोकणात 11 तारखेला, पुण्यात 12 तारखेला तर मुंबईत 13 तारखेला मान्सूनचा दमदार पाऊस पडेल, असा अंदाजही पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्याने बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे विदर्भ मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.