Cyclone Nisarga : अरबी समुद्रातील सक्रिय वादळ बनलं शक्तिशाली, मुंबईवर धोक्याचं सावट, Red Alert जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना संकटाशी झुंज देत असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राला आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी आपल्या ताज्या माहितीत सांगितले की, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा भयंकर अशा चक्रीवादळात बदलू शकतो. यामुळे आता मुंबईला जास्त धोका आहे. आयएमडीनुसार 3 जूनला नॉर्थ महाराष्ट्र आणि साऊथ गुजरात किनार्‍यावर हे ‘निसारगा’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईसह ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापुर आणि अंबरनाथसारखी शहरे प्रभावित होऊ शकतात.

मुंबईवर घोंघावत आहे धोका

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात ’निसारगा’ च्या धोका पाहता रेड अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी असे सांगण्यात आले होते की, या चक्रीवादळाचा गुजरातला जास्त धोका आहे आणि मुंबईवर जास्त परिणाम होणार नाही. परंतु, आता हवामान विभागाने म्हटले आहे की, या चक्रीवादाळाचा रोख उत्तर महाराष्ट्राकडे झाला आहे, ज्यामुळे मुंबई सर्वात जास्त प्रभावित होऊ शकते.

कोरोनाशी लढणार्‍या मुंबईला धोका

कोरोनाशी झुंज देत असलेल्या मुंबईसाठी हे वृत्त अतिशय अस्वस्थ करणारे आहे. विभागाच्या माहितीनुसार हे वादळ 2 जून रोजी उत्तरेकडे सरकेल आणि 3 जून रोजी सायंकाळी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातचा किनारा ओलांडेल, ज्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

सायक्लोन मॅनने दिली महत्वाची माहिती

भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि सायक्लोन मॅन म्हणून प्रसिद्ध, वादळाचे पूर्वअंदाज सांगणारे मृत्युंजय महापात्रा यांनी आज सांगितले की, 3 जून रोजी सायंकाळी वादळ जेव्हा किनारा पर करेल तेव्हा त्याचा वेग 105 ते 110 किलोमीटर प्रति तास असेल, ज्यामुळे दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम आजबाजूच्या भागावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. यासाठी आयएमडीने केरळ, कर्नाटकचा किनारी भाग, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कशी तयार होतात चक्रीवादळं?

पृथ्वीच्या वायुमंडळात हवा असते, समुद्राच्या वर सुद्धा जमीनीप्रमाणे हवा असते, हवा नेहमी उच्चदाबाकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असते. जेव्हा हवा गरम होते तेव्हा ती हलकी होते आणि वर जाऊ लागते, जेव्हा समुद्राचे पाणी गरम होते, तेव्हा त्याच्यावरील हवा गरम होते आणि वर जाऊ लागते. याठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागतो, आजूबाजूची थंड हवा या कमी दाबाच्या पट्ट्याला भरण्यासाठी या क्षेत्राकडे वेगाने सरकू लागते. परंतु पृथ्वी आपल्या आसाभावेती फिरत असल्याने ही हवा सरळ दिशेत न येता वळून गोल फिरू लागते आणि त्या जागेवरून पुढे जाऊ लागते, यास चक्रीवादळ म्हणतात.