Pune News : येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा घसरणार, थंडीच्या दिवसातही होणार पावसाचा शिडकाव, हवामान खात्याचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उद्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26) शहर आणि परिसरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा रविवारी सकाळी साडेआठपर्यंत 15.1 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे. सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. मात्र, येत्या दोन दिवसात किमान तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसने घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. प्रजासत्ताक दिनी दर वर्षी थंडी असते. मात्र, यंदा हवामानात बदल झाल्याचे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.2 अंश सेल्सिअसने वाढून 32.6 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे.

राज्यात सध्या थंडी कमी-जास्त होत आहे. मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत वातावरणात बदल होतील. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि. 28) मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. विशेषतः पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा आदी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात गेल्या सहा महिन्यांपासून चक्रीवादळाची मालिका सुरू आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून राज्यातील मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत थंडी असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट केले आहे. काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागतील. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये देशात झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा, तर उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे गुरुवारपासून वातावरणात आणखी बदल होणार आहेत.