Weather Forecast : राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची स्थिती कायम

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – ऐन कोरोनाच्या संकटात राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. गेल्या दोन दिवसांपासून तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशात आता आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाच संकट राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 

 

 

पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तर कर्नाटकपासून विदर्भापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात अवकाळीचे ढग दाटले असून आणखी 5 दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे येत्या 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. आज पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. सोबतच या जिल्ह्यात येत्या 3 तासांत विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे पुढील 3 ते 4 तासात मध्य महाराष्ट्रासह दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.