पुण्यासह ‘या’ भागांमध्ये 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात थंडी पडली होती. परंतु दिवाळीच्या तोंडावर थंडी गायब झाली. तसेच ढगाळ वातावरणामध्येदेखील वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे. राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्ट्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. दिवाळीच्या आधी राज्यात अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर थंडी पडली होती. पुणे जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली होती. तसेच पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा, अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहेत.