Weather Update : तापमानात नाही होणार बदल ! IMD नं ‘या’ राज्यांमध्ये आज, उद्या आणि 5 फेब्रुवारीच्या दिवशी वर्तविला पावसाचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि सध्या थंड वारा जाणवू लागला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता थंडीपासून दिलासा मिळाला आहे तर तापमानातही वाढ झाली आहे, परंतु भारताच्या हवामान खात्याने बुधवारसह येणाऱ्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. अलर्ट मध्ये संबंधित राज्यांची नावे देण्यात आली असून त्यामध्ये पावसासह गारपीटही होईल अशी चेतावणी देण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितले की, येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर असे सांगितले गेले की येत्या 24 तासांत शीतलहरीपासून सुटका मिळू शकते.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तानात चक्रीवादळ तयार होत आहे. मध्य पाकिस्तान आणि पश्चिम राजस्थानमध्येही चक्रीवादळाची परिस्थिती आहे. या बदलांमुळे 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून उत्तर पश्चिम हिमालयीन प्रदेशातील हवामानावर परिणाम होऊ शकतो. विभागाने सांगितले की, “3 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमधील वेगवेगळ्या भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.” तसेच ही परिस्थिती 3 आणि 4 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशसाठी आणि 3 आणि 5 फेब्रुवारीला उत्तराखंडसाठी असणार आहे.

त्याशिवाय सांगितले गेले की उत्तर पश्चिम भारतातील मैदानी प्रदेशात 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान विजांच्या कडकडाटीसह पाऊस आणि गारपीट होऊ शकते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 4 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हवामान बिघडू शकते. पावसासह गारपिटीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. हीच परिस्थिती पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये 5 फेब्रुवारी 2021 रोजी राहू शकेल.