आगामी 48 तासात राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत ‘पारा’ घसरला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यामध्ये थंडीचा जोर वाढत असताना राज्यातील 7 शहरांमध्ये पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानामध्ये सतत होणाऱ्या बदलामुळे नागरिक हैराण झाले असून बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह अनेक ठिकाणी दोन दिवस गारवा वाढला असून शनिवारी पनवेल येथे किमान 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातही तापमानाचा पारा घसरला आहे. पुढच्या दोन दिवसांत मुंबईसह उपनगरमधील तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
राज्यातील यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर, सांगली परिसरामध्ये विजांच्या गडगडटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये यावेळी ढगांचा गडगडाट आणि वादळी वारे येतील अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळाचा मराठवाड्यावर परिणाम होणार आहे. त्यानुसार नगरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दिवसा 31 ते 32 अंश सेल्सियस तापमानापर्यंत पारा चढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही रात्री थंडी जास्त आणि हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.