राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज !

पोलिसनामा ऑनलाईन – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तळकोकणात समुद्र किनार्‍याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. काल पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले तापमान कमी झाले होते. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणता पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काल अनेक भागांत झालेल्या मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मनमाड शहरात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नद्या नाले दुथरीभरून वाहत होते.