हार्दिक पांड्या तंदुरुस्त; आस्ट्रेलिया मालिकेत उर्वरित सामन्यासाठी संधी मिळण्याची शक्यता?  

मुंबई : पोलिसनामा- दुबईत झालेल्या आशिया चषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झालेला भारताचाअष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आंतराष्ट्रीय क्रिकेट पासून बराच काळ लांब आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाकडून खेळताना मुंबईच्या निम्या संघाला तंबूत पाठवत आपण फिट असून ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे  संकेत त्याने दिले आहेत.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर बडोदा आणि मुंबई यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात हार्दिकने एकूण १८.५ षटकात ८१ धावा देत मुंबईच्या ५ फलंदाजांना बाद करत आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. भारतीय संघात सध्या एकही अष्टपैलू खेळाडू नसल्याने त्याची उणीव भासत असल्याने एम.सी.ए मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हार्दिक पांड्याचा विचार होण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तान विरुद्ध खेळताना पाठीला झालेल्या दुखापदीनंतर हार्दिकला भारतीय निवड समितीने पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यासच संघात समावेश करण्याचे संकेत दिले होते. मुंबई विरुद्ध उत्कुष्ट गोलंदाजी करत  हार्दिकने ५ बळी घेतले. महत्वाची बाब म्हणजे त्याने सर्वाधिक १८.५ षटके टाकली . या कामगिरीमुळे त्याने  निवड समितीचे लक्ष  वेधून घेतले असून आता प्रतीक्षा आहे ती त्याच्या पुनरागमनाची.
मुंबई संघाचा कर्णधार सिद्धेश लाड (१३०) आणि श्रेयस अय्यर (१७८) या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २८३ धावांच्या जोरावर खराब सुरुवातीनंतर  संघाला मजबूत स्थितीत आणून सोडले. या दोघांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ४६५ धावा केल्या .
 प्रतिउत्तरात बडोदा संघानेही उत्तम खेळ करत एका  विकेटच्या मोबदल्यात २४४ धावा केल्या असून आदित्य वाघमोडे ८७ तर विष्णू  सोलंकी १२८ धावांवर खेळत आहेत.