“त्या” महिला नेत्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले घुंगरू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला त्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घुंगरू भेट देणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना त्या म्हणाल्या, “आघाडी सरकार असतांना तत्कालीन गृहमंत्री (कै.)आर.आर.पाटील यांनी डान्सबार बंदी केली होती. मात्र, या सरकारला ही बंदी न्यायालयात टिकविता आलेली नाही, ती कायम रहावी यासाठी न्यायालयात बाजू मांडलेली नाही. त्यामुळे आता राज्यात डान्सबार सुरू होणार आहेत. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना कुरीयरव्दारे घुंगरू पाठविणार आहोत.

faujiya-khan

आर.आर.पाटील यांनी डान्स बार बंदी का केली होती ?
आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदा ३० मार्च २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबार बंदीबाबत सूतोवाच केले. मुंबई वगळता राज्यात डान्सबार बंदी करण्याचा त्यांचा मनसुबा होता. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांच्यासह दोन आमदारांनी पनवेल मधील डान्सबारमुळे तरुण पिढी कशी वाहवत चालली आहे, याकडे लक्ष वेधले होते. त्यातच आर.आर.पाटील ऊर्फ आबा यांनाही त्यांच्या गावाकडून काही कथा कानावर आल्या होत्या. त्यांच्या तासगाव मतदारसंघातील काही तरुणींना बसमध्ये घालून पॅकेज देऊन पनवेल, रायगडच्या डान्सबार पर्यंत आणले जात होते. त्यांच्याकडील पैसे संपले की, त्यांना वाऱ्यावर सोडले जात होते. या पॅकेजमुळे गावाकडची पिढी बरबाद होत असल्यामुळे आबा अस्वस्थ होते.उच्च न्यायालयाने डान्सबार आणि पंचतारांकित हॉटेलातील डान्स असा भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पंचतारांकित हॉटेलांतील डान्सबारवर बंदीची प्रक्रिया आबांनी सुरू केली. इतकेच नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आबांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.