सोशल मीडियावर ‘चौकीदार’ आणि ‘थापाबाई’ यांची लग्नपत्रिका व्हायरल

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत उतरली नसली तरी राज ठाकरे मोदी-शहा यांच्या विरोधात प्रचार सभा घेत आहेत. लाव रे तो व्हिडिओ नंतर राज ठाकरेनीं आता वेगळ्याच प्रकारचा गाजर विवाह आयोजित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांचा वेगळाच असा गाजर विवाह आयोजित केला आहे.

२९ एप्रिल रोजी ठाणे मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मनसेच्या वतीने चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ही पत्रिका व्हायरल केली. ही पत्रिका लोकांचा चर्चेचा विषय झाली आहे. या पत्रिकेतून मनसेने भाजपवर टीका केली आहे.

नवी मुंबईतील मनसेच्या वतीने मतदानाच्या दिवशी या गाजर विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेने या विवाहाचे निमंत्रण दिले आहे. या पत्रिकेत खोट्या आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी ५६ इंचाच्या मुहूर्तावर गाजर विवाह होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील. असे ह्या पत्रिकेत लिहिले आहे. त्यामुळे हि पत्रिका सर्वांसाठी चर्चेचा विषय झाली आहे.