मोदींचा जबरा फॅन ; त्याने चक्क लग्नपत्रिकेतूनच समजवला राफेल करार !

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळे सज्ज झाले आहेत. जसं राजकीय पक्ष या निवडणुकांसाठी तयार होत आहेत, तसं पक्षांचे समर्थकही पक्षाला साथ देण्यासाठी नवनवीन शक्कल लढवताना दिसत आहे. अशाच एका भाजप समर्थकाने मोदींना साथ देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. गुजरातमधील या समर्थकाने स्वतःच्या लग्न पत्रिकेवर चक्क राफेल डीलबाबत काही मुद्दे छापले आहेत. त्यासोबत या करारात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही, असंही सांगितलं आहे.

गुजरातमधील युवराज आणि साक्षी या जोडप्याच्या लग्नपत्रिकेत त्यांनी हा मुद्दा छापला आहे. 22 जानेवारी रोजी यांचा विवाह आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेतील पहिल्या पानावर सर्वकाही नित्यनियमाप्रमाणे म्हणजेच सर्वसाधारण लग्नपत्रिकेप्रमाणे छापण्यात आले आहे. नवऱ्या मुलाचे नाव, नवरी मुलीचे नाव, लग्नाची वेळ ठिकाण, देवांचे फोटो आणि कुटुंबाची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर शेवटच्या एका ओळीतून मोदींना मतदान हेच आमचे गिफ्ट, असं लिहिले आहे. तर लग्न पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर राफेल करारासंदर्भाची सर्व माहिती देण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका इंग्रजीत असून राफेलची माहितीही इंग्रजीतच छापण्यात आली आहे. शांत रहा अन् मोदींवर विश्वास ठेवा…, असं आवाहनही पत्रिकेत करण्यात आले आहे.

आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचं आवाहन करत त्यासोबत राहुल गांधींच्या राफेल कराराबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. देशात मोदींवर नाराज एक वर्ग आहेच, परंतु मोदींचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याचेही यावरून दिसत आहे.

दरम्यान, कर्नाटक भाजपाच्या महिला सरचिटणीस शोभा करंडलाजे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही लग्नपत्रिका शेअर केली आहे. त्यामुळे ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

You might also like