Welcome 2021 : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलिसांसोबत केलं नववर्षाचं स्वागत (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचा उत्साह वाढावा यासाठी नववर्षाचं स्वागत पोलिसांसोबत केक कापून केले. अनिल देशमुख हे रात्री बारा वाजता पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहिले. यावेळी त्यांना होप 2021 असे लिहिलेला केक कापला. तसेच पोलिस दलाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2021 हे वर्ष आशादायी असणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय…
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता नियंत्रण कक्षात जाऊन नववर्षाचं स्वागत केले. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात आलेला फोन घेतला व तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतली. 12 वाजून 2 मिनिटांनी नियंत्रण कक्षातील फोनची बेल वाजली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो फोन उचलला. नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, तुमची काय तक्रार आहे ? त्यावेळी सिंहगड रोडवरील आनंद नगर मधील एका सोसायटीत मोठ्याने आवाजात स्पिकर्स सुरु असल्याची तक्रार त्या व्यक्तीने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी, तुमची तक्रार बाजूच्या पोलिस स्टेशनला सांगतो असे म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

तक्रारदार यांची तक्रार ऐकून घेतली. 12 वाजून 2 मिनिटांनी ही तक्रार आली होती. त्यानंतर पुढील तिसऱ्या मिनिटाला पोलिस घटनास्थळी पोहचले होते. त्या आगोदर अनिल देशमुख यांनी सर्वांबरोबर केक कापला. यावेळी देशमुख यांनी गेली 10 महिने पोलिस, डॉक्टर, परिचारकिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पोलिस थकले जरुर आहेत. पण हिंमत हारलेले नाहीत. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याच्या बरोबर नव्या वर्षाची सुरुवात करायला मिळाली याचा मला आनंद आहे. तसाच आनंद त्यांनाही झाला असले. हे नवीन वर्ष कोरोनामुक्त असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.