नीरेत पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत, वाल्हे मुक्कामी मार्गस्थ

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याकरिता पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे रविवारी (दि.१७) नीरा (ता.पुरंदर)येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात विठु नामाच्या जयघोषात मोठया भक्तीमय वातावरणात स्नान घालण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील सहा वर्षापासून आळंदीला जात आहे. कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूरहून आळंदीकडे निघाला असून तो अष्टमीला आळंदीला पोहोचणार आहे.

पांडुरंगाचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्काम आटोपून रविवारी (दि.१७) सकाळी आठ वाजता दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीच्या तीरावरील प्रसिद्ध दत्तघाटावर दाखल झाला. यावेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तीमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात आले. दत्त मंदिराचे पुरोहीत सचिन घोडके यांनी पादुकांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्हयातून पुणे जिल्ह्यातील नीरा येथे सकाळी आठच्या सुमारास प्रवेश केला. त्यावेळी भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा दुपारच्या विसाव्या करिता नदीकिनारी असलेल्या पालखी तळावर विसावला. त्यावेळी नीरेचे माजी. सरपंच राजेश काकडे, बाळासाहेब भोसले, शामराजे कुंभार यांनी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी मार्गस्थ झाला.

पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजर असतात अशी वारक-यांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणने मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करुन सोहळा सुरु केला असल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकर महाराज यांनी सांगितले. यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १५ तर रथा मागे १० दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे सोळा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळा प्रमुख गोपाळ महाराज देशमुख यांनी दिली.

Visit : Policenama.com