‘सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर तब्बल 80 हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लवकरच SM रॅकेटचा छडा लावला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये सावंत म्हणतात, “सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मीडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच या बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सचा खुलासा करू जे भाजपच्या IT विभागानं बनवलं आहे. ज्यांचा उद्देश हा महाराष्ट्राला बदनाम करणं होता.”

ट्विटर, फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतिमा मलीन करण्यात आली. त्यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आलं. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आणि सरकारची बदनामाी करण्यासाठी 80 हजार Fake Accounts
सायबर सेलनं दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार फेक अकाऊंट्स नव्यानं उघडले गेले होते आणि इतर बनावट होते. एरवी मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुबई पोलिसांनी आपल्या कामगिरीनं जगात लौकिक मिळवला आहे. परंतु सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जून पासून हे अकाऊंट्स उघडले गेले असं अहवालात सांगितलं आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आदेश सायबर सेलला दिले आहेत. त्यानुसार सध्या 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.