West Bengal Election :राहुल गांधींनी बंगालमध्ये ज्या-ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या-त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या बाबतीत ‘हे’ घडलं

कोलकाताः पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. 200 जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणा-या भाजपला केवळ 77 जागावर समाधान मानावे लागले आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नाही. दरम्यान, बंगालमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीच्या तब्बल 85 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन ठिकाणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीनी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीने 292 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 42 जागांवर अनामत रक्कम वाचवता आली. या आघाडीतील आयएसएफ या घटक पक्षाला एक जागा मिळाली. तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे बंगालच्या विधानसभेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य दिसणार नाही. राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. माटीगारा-नक्षलवाडी मतदारसंघावर काँग्रेसचा दशकभरापासून कब्जा होता. मात्र येथील आमदार शंकर मालाकार यांना यावेळी केवळ 9 टक्के मते मिळाली. गोलपोखर येथेही काँग्रेसला केवळ 12 टक्के मते मिळाली. काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीमध्ये डाव्या पक्षांनी 292 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 21 जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आले. तर काँग्रेसने 90 जागांपैकी 11 जागांवर डिपॉझिट वाचवली आहे. तर आयएसएफने 30 जागांपैकी 10 जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. तसेच एका जागेवर विजयही मिळवला. डाव्या पक्षांना केवळ चार जागांवर तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहता आले आहे.