PM मोदींच्या रॅलीतून सौरव गांगुली राजकीय इनिंग सुरू करणार?

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा यांचा गड वाचवण्याकडे कल आहे. तर दुसरीकडे भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून क्रिकेट क्षेत्रातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपला यश आले आहे. यातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत गांगुली सहभागी होतील असे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी (दि.7) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असूून एका सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी गांगुली पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वृत्ताला गांगुली आणि भाजपकडून दुजोरा मिळाला नाही. दरम्यान अलीकडेच गांगुली यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून ते सध्या घरी आराम करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय हा सर्वस्वी गांगुलीवर अवलंबून आहे. त्यांची प्रकृती आणि स्वास्थ्य उत्तम असेल, तर ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. गांगुलींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे मत भाजप प्रवक्ते शामिक भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे.