WB Results : ममता बॅनर्जीच्या TMC ने ओलांडला बहुमताचा आकडा, BJP नर्व्हस नाईंटीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. अशातच अवघ्या देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुक निकालाकडे लागले आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून जिंकणार की पडणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने जोरदार मुसंडी मारली आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होत असल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे ममता या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे. यामुळे सध्या बंगालमध्ये गड आला, पण सिंह गेला अशी अवस्था होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

सध्याच्या कलांनुसार भाजपाला 98 जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूलने 188 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 90 जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे.

ममता या अधिकारी यांना नंदीग्राममधून काहीही करून पाडणार याच निश्चयाने लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले असले तरीही ही निवडणूक भाजपासाठी जल्लोष करण्यासारखी आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे.