‘बंगाल’साठी भाजपकडून 157 उमेदवारांची यादी जाहीर; 8 मुस्लिम नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 27 मार्चपासून सुरु होत आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपनेही आपल्या 157 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यांसाठी ही नावांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये 8 मुस्लिम नेत्यांचा समावश आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मुकुल रॉय, खासदार जगन्नाथ सरकार यांच्या नावाचाही समावेश आहे. मुकुल रॉय हे नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर खासदार जगन्नाथ सरकार शांतिपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार आहेत. तसेच भाजपने चोपडा मतदारसंघातून मोहम्मद शाहीन अख्तर, गोलपोखर मतदारसंघातून गुलाम सरवार, हरिश्चचंद्रपूरहून अतीउर रहमान, साकरदिघी मतदारसंघातून माफूजा खातून, भागवांगोला मतदारसंघातून महबूब आलम, रानीनगर मतदारसंघातून मसुहारात खातून, डोमकल मतदारसंघातून रुबिया खातून आणि सुजापूर मतदारसंघातून एस के जियादुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे.

तसेच काँग्रेसचे माजी नेते सोमेन मित्रा यांची पत्नी शिखा मित्रा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिखा यांना कोलकाताच्या चौरिंघी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी याच मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.

पाच खासदारांनाही उमेदवारी

भाजपने विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुकांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये 8 मुस्लिम नेत्यांचा समावेश आहे. यातील विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत पाच खासदारांनाही तिकीट दिले आहे. यामध्ये जगन्नाथ सरकार यांच्यासह इतरांचा समावेश आहे.