ममता बॅनर्जींच्या समर्थनासाठी शरद पवार निवडणूकीच्या मैदानात, म्हणाले…

रांची : पोलीसनामा ऑनलाईन –   एक महिला जी गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम बंगालच्या सत्तेवर आहे. तिच्याविरोधात पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उभे आहेत. ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण ताकद लावली आहे. मात्र दुसरीकडे शेतकरी आंदोलनाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र पंतप्रधान मोदींकडे शेतक-यांना भेटण्यासाठी वेळ नाही. देश-जग फिरणारे पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटण्यासाठी 20 किलोमीटर प्रवास करू शकत नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अनेकजण सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ममता बॅनर्जींच्या मदतीला धावून आले आहेत. रांचीमध्ये पक्षाच्या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शरद पवारांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार गैर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्था सीबीआय, ईडी यांच्या माध्यमातून त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यानही मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांचा वापर होत आहे. केंद्र सरकार सद्यस्थितीमध्ये केवळ एकच काम करत आहे. जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे सीबीआय आणि ईडीच्या मदतीने त्रास देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.