… अन् त्या तरुणाने PM मोदींच्या कानात काय सांगितले याचे गुपित केले उघड

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन –   पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रचारादरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका तरुणाच्या खांद्यावर हात ठेवलेला एक फोटो व्हायरल झाला होता. दरम्यान आता या फोटोतील तरुणाने समोर येत त्यावेळी पंतप्रधानांना नेमक काय सांगितलं याचे गुपित उघड केले आहे.

सोनारपूर येथे शनिवारी (दि. 3) पंतप्रधान मोदींची प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी झुल्फिकार हा तरुण रॅलीत सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने नमाजी टोपी परिधान केली होती. त्यावेळी मोदींनी त्याची भेट घेत विचारपूस केली होती. याबाबत झुल्फिकार एका हिंदी दैनिकाला माहिती देताना म्हणाला की, पंतप्रधान मोदींना एकदा पाहावे अन् लांबून नमस्कार करावा, अशी माझी इच्छा होती. त्या दिवशी पंतप्रधान मोदी गाडीतून येत होते. सर्वजण त्यांना हात जोडून नमस्कार करत होते. पंतप्रधान मोदींनीही त्याच अंदाजात नमस्कार केला. त्यानंतर ते गाडीतून उतरले. त्यांनी माझे नाव विचारले. मी सांगितले माझ नाव झुल्फिकार अली. पण हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांना ऐकू आले नाही. त्यानंतर ते जवळ आले. मी त्यांना माझ नाव सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारले की, तुला काय बनायच आहे. तेंव्हा मी त्यांना सांगितले की, मला नगरसेवक, आमदार, खासदार बनायचे नाही तर मी राष्ट्रहितामध्ये काम करू इच्छितो. यावेळी आपल्या भागाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा होत असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. मंत्री फिरहाद हकीमसुद्धा या भागाला मिनी पाकिस्तान म्हणतात. पण आमच्यासारखे भारतीय जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या भागाला पाकिस्तान आणि बांगलादेश बनू देणार नाही. जे लोक देशहिताबद्दल विचार करतात, ते या भागाला पाकिस्तान, बांगलादेश बनू देणार नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.