पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘हा’ नेता ममता दीदींना देणार आव्हान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नुकत्याच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ममता दीदींचा पराभव करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला अजून उमेदवार भेटला नाही आहे. मात्र ममता यांना त्यांच्या मतदारसंघातून कोण आव्हान देणार ? या बाबतीत भाजपने पूर्वीचे तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांना ममता दीदींच्या विरोधात उभे केले आहे. सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम मतदारसंघातुन ममतादीदींना आव्हान देणार आहे. ममता दीदींची करीष्मा झाकोळून आपली छाप मतदारसंघावर उमटवण्याचं मोठं आव्हान सुवेंदू अधिकारी यांच्या समोर असणार आहे.

ममता दीदी एकाच मतदारसंघातून लढवणार निवडणूक

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ५ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या २९१ जणांची यादी जाहीर केली. यामध्ये त्यांनी ते स्वतः नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ममता यांनी त्यांचा हक्काचा मानला जाणारा भोवानीपोरे मतदारसंघ न निवडता त्यांनी स्वत:साठी नंदीग्राम मतदारसंघ निवडला आहे. तसेच ममता यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा ‘सेफ गेम’ न खेळता त्यांनी नंदीग्राम या एकाच मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या गोटातले मानले जातात. सुवेंदू अधिकारी हे एकेकाळचे पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री होते. सुवेंदू अधिकारी हे मनमोहन सिंग सरकारमधील शिशिर अधिकारी यांचे पुत्र आहेत. मागच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी माकपचे दिग्गज नेते लक्ष्मण सेठ यांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये त्यांचे ममता दीदींशी आणि पक्षातील इतर काही वरीष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध बिघडले आणि यामधूनच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी १७ डिसेंबर रोजी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा व १९ डिसेंबर रोजी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ममता दीदींच्या विरोधात तृणमूलचेच माजी नेते, आमदार, खासदार आणि मंत्री राहिलेले सुवेंदू अधिकारी हेच योग्य आणि सक्षम पर्याय मानला जात आहे.