TMC मध्ये उभी फूट ! तब्बल 10 आमदारांसह 3 खासदार भाजपच्या संपर्कात ?

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये निवणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तशे नेत्यांच्या पक्षांतरालाही वेग येत आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसकडून आज निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. हि यादी जाहीर होण्याअगोदरच ममता यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता यांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांकडून पक्षात फूट पडण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१० आमदार आणि तीन खासदार भाजपच्या संपर्कात
टीएमसीचे १० आमदार आणि तीन खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील काही दिवसांत भाजप या नेत्यांची पार्श्वभूमी तपासणार आहे त्यानंतर त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. तसेच टीएमसीतून आलेल्या आमदारांपैकी भाजप दोन आमदारांना तिकीट देणार नाही. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

टीएमसी २९४ उमेदवारांची करू शकते घोषणा
ममता शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी शूभ मानतात. त्यांच्याकडून आज सर्व २९४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. एवढेच नाही, तर यावेळी टीएमसीकडून १०० पेक्षा जास्त नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.

निवडणुकीतील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी टीएमसीकडून मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ममता सरकारच्या दहा वर्षांतील कामे, वाद संपवणे आणि लोकसभेत अपेक्षित यश न आलेल्या भागांत जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे सांगण्यात आले. ममता बॅनर्जी या गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीग्राममधून आपला अर्ज भरणार आहे.

बंगालमध्ये किती टप्प्यांमध्ये किती जागांसाठी होणार मतदान
पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी ३० जागांवर २७ मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात ३० जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात ३१ जागांसाठी, ६ एप्रिलला चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी १० एप्रिलला पाचव्या टप्प्यात ४५ जागांसाठी १७ एप्रिलला, सहाव्या टप्प्यात ४३ जागांसाठी २२ एप्रिलला, सातव्या टप्प्यात ३६ जागांसाठी २६ एप्रिलला तर आठव्या टप्प्यात ३५ जागांसाठी २९ एप्रिलला मतदान होईल. यानंतर २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.