WB Elections Results : ममता बॅनर्जींचा EC वर गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘…तर भाजपाला 50 जागाही मिळाल्या नसत्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 213 जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या दणदणीत विजयानंतर बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. बंगालमध्ये यावेळी निवडणूक आयोग भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखे वागत होते, असा गंभीर आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. सुरुवातीपासून मी हेच सांगत होते की, आम्ही 200 चा आकडा पार करणार आहोत, तर भाजपा 70 चा आकडाही पार करणार नाही, असे त्या म्हणाल्या. नंदीग्रामच्या लढतीवरही त्या म्हणाल्या नंदीग्राममधील पराभवामुळे आमचे काही नुकसान नाही. या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड झाली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर 3 तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिले जात नव्हते, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान तृणमूलने 213 जागांवर विजय मिळवला असून भाजपाला केवळ 77 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूलने बहुमताचा आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला आहे.