PM नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द, कोरोना संदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत घेणार आढावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याने हा दौरा रद्द करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे.

पंतप्रधान मोदी उद्या 23 एप्रिलला सकाळी 9 वाजता कोरोना संबंधित स्थितीची समीक्षा करतील. यानंतर सकाळी 10 वाजता ते कोरोनाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक करतील. यानंतर दुपारी 12.30 वाजता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने देशातील मोठ्या ऑक्सिजन निर्मात्यांसोबत बैठक घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.23) बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या. बंगाल भाजपने या सभांची तयारी पूर्ण केली होती. मात्र, आता पंतप्रधान मोदींचे हे कार्यक्रम रद्द झाले आहे. यासंदर्भात मोदींनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.

देशातल्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दिल्लीबरोबरच अन्य काही  राज्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेशही दिले आहेत. दरम्यान, अनेक राज्यांना भासत असलेल्या ऑक्सिजनच्य कमतरेच्या संदर्भात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. यामध्ये ऑक्सिजन उत्पादन वाढवणं, त्याच्या वितरणाचा वेग वाढणवणे आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.