WB Election Results : नंदीग्राममधील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘तिथे जे चाललंय याला रडीचा डाव एवढच म्हणता येईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. मात्र नंदीग्राम मतदारसंघातील निवडणूक निकालावरून संभ्रमावस्था आहे. सुरुवातीला ममता बॅनर्जींचा विजय झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शुभेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचे जाहीर केले. या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी फेरमोजणीची मागणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप मतमोजणी सुरू असून, सर्वांनी संयम राखावा, असे आवाहन तृणमूलने आहे. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकारावर टीका केली आहे. बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि संबंध देशाच्या सत्तेला पराभूत केले. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला रडीचा डाव एवढच म्हणता येईल, असे म्हटले आहे.

तत्पूर्वी तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवू यात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असे ट्विट शरद पवार यांनी केले होते. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. कारण येथे ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा लढा पाहायला मिळाला होता. त्यात तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारत सत्ता काबीज केली आहे.