ममता सरकारला आणखी एक धक्का, वनमंत्री राजीब बॅनर्जी यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोणता ना कोणता नेता पक्षाचा हात सोडून जात आहे. शुभेंदू अधिकारी यांनी सुरू केलेली ही साखळी अजूनही सुरू आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. राज्य सरकारचे वन मंत्री राजीब बॅनर्जी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीब यांनी राजीनाम्यात म्हंटले कि, पश्चिम बंगालच्या लोकांची सेवा करणे ही अत्यंत सन्मान आणि सौभाग्याची बाब आहे. ही संधी मला मिळाल्याने मी कृतज्ञता व्यक्त करतो.’ राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजीब बॅनर्जी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

याआधी हुगळी जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ दर्गा येथील पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरुवारी इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या नवीन राजकीय संघटनेची घोषणा केली होती. पीरजादा सिद्दीकी म्हणाले की, नव्याने स्थापन झालेली संघटना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 294 जागा लढवू शकतात. त्यांनी असेही म्हंटले कि, डाव्या-कॉंग्रेसच्या युतीबरोबर त्यांच्या संघटनेची युती होण्याची शक्यता आहे. राजकीय संघटनेच्या शुभारंभाच्या प्रसंगी सूफी मजारचे प्रमुख सिद्दीकी म्हणाले, “घटनात्मक लोकशाही संरक्षित व्हावी, सर्वांना सामाजिक न्याय मिळावा आणि आपल्या सर्वांना सन्मानाने राहता येईल, यासाठी आम्ही हा पक्ष स्थापन केला आहे.” तृणमूल कॉंग्रेसबरोबर युती होण्याच्या शक्यतेच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “भाजपाला रोखण्यासाठी मुख्यमंत्रिपदासाठी सर्वांना सोबत घेण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांची आहे.”

सिद्दीकी यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तृणमूल कॉंग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी दावा केला की, ” अल्पसंख्याकांना चांगलेच ठाऊक आहे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यासाठी काय केले. ते तृणमूल कॉंग्रेसला पाठिंबा देतील.” पश्चिम बंगाल विधानसभेसाठी एप्रिल-मेमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.