तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील ‘लेटरवॉर’ मध्ये टपाल विभाग ‘गोत्यात’

कोलकाता : वृत्तसंस्था – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात चालेल्या राजकीय वादामध्ये भारतीय टपाल विभाग विनाकारण भरडून निघत आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथे असलेल्या कालीघाट पोस्ट ऑफिसमध्ये ‘जय श्री राम’ लिहिलेल्या हजारो पत्रांचा ढिग लागला आहे. या पत्रांमध्ये जय श्री राम असे लिहिले आहे आणि अशी पत्रे ममता बॅनर्जी यांना लिहिली आहेत. ममता बॅनर्जी यांचे घर या पोस्ट ऑफिसच्या कार्यक्षेत्रात येते.

टपाल विभागात पोस्ट कार्ड खूप गरजेचे असतात, म्हणून टपाल विभाग पत्रांना प्राथमिकता देते. पोस्ट ऑफिसच्या सूत्रांनी सांगितले की, सामान्यतः, मुख्यमंत्र्यांसाठी ३० ते ४० पत्र रोज येतात. पण अचानकपणे या पत्रात दुप्पटीने वाढ झाली आहे. ही पत्रे टपाल कार्यालयात दररोज येणाऱ्या एकूण पत्रांच्या तुलनेने १० % आहेत.

‘जय हिंद, जय बांग्ला’ लिहून TMC चे प्रत्युत्तर

ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या जय श्री राम च्या पत्रांना जसेच्या तसे प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाला आहे. तृणमूल काँग्रेसने भाजपच्या जय श्री राम ला जय हिंद, जय बांग्‍ला असे लिहून सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तृणमूल काँग्रेसने ही पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानासाठी एक स्वतंत्र पोस्टमन

ममता बॅनर्जी जेव्हापासून मुख्यमंत्री झाल्या आहेत तेव्हापासून ममता यांच्या निवासस्थानाला स्वतंत्र पोस्टमन आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, पोस्टमन दररोज पत्रांना घेऊन जातो आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवतो. सामान्यतः, शांत राहणारे हे पोस्ट ऑफिस जय श्री राम च्या पत्रांचा सामना करण्यास सज्ज झाले आहे.