तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाटवरून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. “तुम्ही सर्व डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदबाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भांडणं लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील,” असं नुसरत जहाँ म्हणाल्या.

नुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला. पश्चिम बंगालमधील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे कोरोनाची लस घेऊन जाणाऱ्या ट्रकला १२ किलोमीटर लांबचा पल्ला गाठून जावं लागलं होतं. कृषी कायद्यांच्या विरोधात ते आंदोलन करत होता. यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांना महामार्ग बंद केला होता. त्यामुळे कोरोनाची लस घेऊन जाणाऱ्या ट्रकला लांबचा पल्ला गाठावा लागला होता.”पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून सर्वात वाईट राजकारण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांनी लसीची वाहतूक करणारा ट्रक थांबवला. आता दुसरीकडे तृणमूलच्या नेत्या प्रचारादरम्यान भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. परंतु ममता बॅनर्जी का शांत आहेत?,” असा सवाल अमित मालवीय यांनी केला.