ममता बॅनर्जीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही खराब नशीब तुमची वाट पाहतंय’

हुगळी : पोलीसनामा ऑनलाईन – तृणमूल काँग्रेस टोलाबाज असल्याची टीका भाजप नेहमी करते. मात्र भाजप दंगाबाज अन् धंदाबाज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे दंगेबाज आहेत. विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ममतांनी मोदींची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्याशी केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही खराब नशीब मोदींची वाट पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली.

पश्चिम बंगालमधील हुगळी येथे बुधवारी (दि. 24) ममता बॅनर्जी यांनी एका रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदीवर घणाघाती टीका केली. बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर मोदीचे शासन असणार नाही. गुंड लोक बंगालवर राज्य करणार नाहीत. रॅलीदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना हावडा शहरातून तिकिट दिले जाण्याची शक्यता आहे.