पश्चिम बंगाल निकालानंतर ममतांचा बॅनर्जींचा इशारा, म्हणाल्या – ‘संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस द्यावी, अन्यथा आंदोलन करणार’

कोलकाता : वृत्तसंस्था – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. दरम्यान मिळालेला विजय हा बंगालच्या जनतेचा विजय असल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांनी टीएमसीकडून जनतेचे आभारही मानले. तसेच देशातील जनतेला मोफत कोरोना लस द्यावी, नाही, तर आपण गांधी पुतळ्यासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपण रॅली काढू, असेही त्या म्हणाल्या. तसेच आमचा शपथग्रहण समारंभ थोडक्यात होईल, यात कोरोनाचे नियमही पाळले जातील, असे त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना डबल सेन्च्यूरीची अपेक्षा होती. 221 जागांवर विजय होण्याची आशा होती. हा विजय बंगालच्या जनतेचा विजय आहे. आम्ही जल्लोष करणार नाही असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. तसेच संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जनतेला दिले.

दरम्यान तृणमूलचे वरिष्ठ नेते तथा मावळते शहर विकास मंत्री फरहाद हकीम यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य स्थिती पुन्हा एकदा रुळावर आणण्यास नव्या सरकारचे प्राधान्य असेल, असे म्हटले आहे.