West Bengal : TMC कार्यकर्त्याची हत्या, गोळीबार पाहणाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथे TMC कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यकर्त्यावर गोळीबार होताना पाहून पक्षाच्या पंचायत समितीच्या सभापतींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राज्यामधील विधानसभेच्या निवडणुकांआधी ही घटना घडल्याने राजकीय वादातून ती घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे TMC ने या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजपाने हा दावा फेटाळत सत्तेत असणाऱ्या पक्षामधील अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले आहे.

रंजीत सरकार असे हत्या झालेल्या तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. तर कालीपद सरकार असे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजीत सरकार हे पक्षाचा कार्यक्रम आटपून रविवारी रात्री घराकडे निघाले होते. त्यावेळी मैनागुडी ब्लॉकमधील सप्तीबारी येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

ज्यावेळी हा सारा प्रकार घडला त्यावेळी तिथे तृणूलचे पंचायत समिती सभापती कालीपद सरकारही उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील वादातून झालेला गोळीबार पाहून कालीपद सरकार यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान तृणमूलचे स्थानिक नेते शिवशंकर मजूमदार यांनी या हत्येसाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे जलपायगुडीचे भाजपा उपाध्यक्ष दीपेन प्रमाणिक यांनी ही हत्या तृणमूलमधील अंतर्गत लढाईचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.