बंगालमध्ये 2 न्यायाधीशांना ‘कोरोना’ची लागण, संपर्कातील सर्वजण होम क्वारंटाईन

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये दोन न्यायाधीशांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हे लक्षात घेता त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना घरी क्वारंटाइन मध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, संक्रमित न्यायाधीश अलीपूरच्या जिल्हा दिवाणी व सत्र न्यायालयात कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंगालमध्ये कोरोनाची एकूण ७३०३ प्रकरणे
ते म्हणाले की, या दोन न्यायाधीशांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना संसर्ग आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोविड-१९ ची आतापर्यंत ७,३०३ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी ४,०२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोविड-१९ मुळे किमान २९४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ७२ लोकांचा इतर गंभीर आजारामुळे मृत्यू झाला आहे आणि ते कोरोना संक्रमितही होते.

डॉक्टरांच्या एका असोसिएशनने ममता यांच्यासमोर ठेवली ही मागणी
पश्चिम बंगालमधील सरकारी रूग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या एका असोसिएशनने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून कोविड-१९ च्या रुग्णांना रूग्णालयातील त्यांच्या वॉर्डमध्ये मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे, ज्यांची प्रकृती चिंताजनक नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोबाइल फोनच्या वापरावरील बंदीमुळे या लोकांवर मानसिक तणाव निर्माण होत आहे. ‘असोसिएशन ऑफ हेल्थ सर्व्हिस डॉक्टरां’नी पत्रात म्हटले आहे की, जर एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर नसेल तर त्याला मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देण्यात यावी.

कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत एका वेगळ्या ठिकाणी कोविड-१९ पीडितांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख करत असोसिएशनने म्हटले आहे की, जवळच्या लोकांना पीडितांना श्रद्धांजली देण्यास नाकारले जाऊ नये. असोसिएशनचे सरचिटणीस मानस गुमाता यांनी पत्रात म्हटले, ‘मृत व्यक्तीच्या जवळच्या लोकांना अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.’

बंगालमध्ये दुरुस्तीच्या कामातून परतलेल्या ओडिसा अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांना क्वारंटाइनसाठी पाठवण्यात आले
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर दुरुस्तीच्या कामावरुन परतलेल्या ओडिसा अग्निशमन सेवेच्या ३७२ कर्मचाऱ्यांना शनिवारी दोन क्वारंटाइन केंद्रांत पाठवण्यात आले आहे. विशेष मदत आयुक्त पीके जेना म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर ओडिसा फायर सर्व्हिस आणि ओडीआरएएफचे जवान तेथे दुरुस्तीचे काम करत होते. ते परतल्यावर त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केंद्रात पाठवण्यात आले आहे. यावर आधीपासूनच सहमती होती. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय क्वारंटाइन केंद्रांत त्यांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवतील, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते येण्यापूर्वी राज्य सरकारने उत्तरा येथील कृपजल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर आणि भुवनेश्वरमधील महसूल अधिकारी प्रशिक्षण संस्थेत त्यांच्यासाठी क्वारंटाइन केंद्राची व्यवस्था केली होती.