पती चेष्टा करत असल्याचं तिला वाटलं, पत्नी व्हिडीओ शुटिंग करत राहिली अन् नवरा पंख्याला लटकला

कोलकाता : वृत्तसंस्था –  पती गळफास लावून आत्महत्या करत असताना त्याची पत्नी तिथेच उपस्थित होती. मात्र, तिने त्याला रोखण्याऐवजी त्याचा आत्महत्येचा व्हिडीओ बनवला. हा सगळा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पतीच्या नातेवाईकांनी महिलेला असे का केल? पतीला आत्महत्या करण्यापासून का वाचवलं नाही? असे विचारले. तेंव्हा तिने पती मस्करी करत आहे, असे वाटले. पण त्याने खरंच आत्महत्या केली, असे उत्तर तिने दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

नेहा शुक्ला (वय 22 रा. हावडा, पश्चिम बंगाल) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तर अमिन साव असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचे गेल्यावर्षी 11 डिसेंबरला लग्न झाले होते. पश्चिम बंगालच्या हावडा येथे वास्तव्यास होते. मात्र या दोघांमध्ये सतत वाद सुरु असायचा. आरोपी पत्नीचे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पतीकडून सातत्याने केला जात होता. याच मुद्द्यावरुन दोघांत सारखे वाद होत असत. पतीने जेंव्हा आत्महत्या केली त्यावेळी देखील याच विषयावर वाद सुरु असल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे. आरोपी पत्नी ही अचानक एकटी 31 मार्च रोजी दिल्लीला माहेरी गेली होती. त्यानंतर ती 5 एप्रिलला पुन्हा सासरी आली होती. त्यानंतर 8 एप्रिलला तिचा पती अमिन साव याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करतेवेळी ती घरात होती. अमनच्या आत्महत्येनंतर त्याचे आई-वडील, बहीण हे सर्व हावडाला आले. अमनच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीच्या चेह-यावर पतीच्या निधनाच्या दु:खाचा लवलेशही दिसत नव्हता. त्यामुळे मृतक पतीच्या बहिणीला संशय आला. यादरम्यान बहिणीच्या हातात आरोपी महिलेचा मोबाईल पडला. तिने तिच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बघितले असता तिला धक्काच बसला. नेहाने तिच्या भावाच्या आत्महत्येची घटना मोबाईलमध्ये जसीच्या तशी कैद केल्याची धक्कादायक घटना समोर आली.