पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का : काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा मुलगाही जाणार भाजपमध्ये

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे . सोमवारी महाजनादेश यात्रेदरम्यान ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत.

सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा शिराळा येथे आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून सत्यजित देशमुख यांनी हा आपला निर्णय जाहीर केला.विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती.

तेव्हापासून सत्यजित यांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यजित देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

आधी इन्कार आणि आता भाजप प्रवेशाची घोषणा –

गेल्या काही दिवसांपासून सत्यजित देशमुख भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांनी ते वृत्त फेटाळलं होत. भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त तथ्यहीन आहे. या बातमीने मला धक्का बसला. मी काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहीन. कोणीतरी जाणीवपूर्वक याअफवा पसरवत आहे, असे ते म्हणाले होते.