सातारा जिल्ह्यातील जवान लेह-लडाख सीमेवर शहीद, गावावर शोककळा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन देश प्रेमाचा वसा हुतात्मा सचिन संभाजी जाधव यांच्या रक्तात भिनलेला होता. वडील सिमेवर देशाचे संरक्षण करुन निवृत्त झालेले तर भाऊ आजही देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर लढत आहे. देशाच्या संरक्षणाचा जणू दुसाळेतील या जाधव कुटुंबियानी विडाच उचलला होता. परंतु शत्रूशी दोन हात करताना हौतात्म्य पत्करलेल्या सचिनच्या शौर्याचा समस्त सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय-38) हे लेह – लडाख सिमेवर कर्तव्य बाजवत असताना शहीद झाले आहेत. सचिन हे 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ही बातमी गावात पसरताच जाधव कुटुंब आणि दुसाळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

शहीद जवान सचिन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या मुळगावी आणलं जाणार असून लष्करी इतमामात कोविडचे नियम पाळून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सन 2002 मध्ये भरती झालेल्या सचिन यांचा कार्यकाळ गतवर्षी संपला होता. मात्र अजुनही देशसेवा करावी म्हणून त्यांनी दोन वर्षे आपली सेवा वाढवून घेतली होती. 4 ऑगस्टला ते दीड महिना सुट्टीवर आले होते. चीनच्या सिमेवर हालचाली वाढू लागल्याने सैन्यातून त्यांना पुन्हा बोलावण्यात आल्याने ते 27 ऑगस्टला कर्तव्य बजावण्यासाठी परतले.

वीरजवान सचिन जाधव यांना लेह लडाख येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चीनी सैनिकांच्या चकमकीत लढत असताना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ही दु:खद बातमी समजताच संपूर्ण तारळे विभागासह दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे. हुतात्मा सचिन जाधव यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.